श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

मृत्यू पुढे ढकलला

गुरुचरित्रा मध्ये अनेक कथानकां मधून ज्ञान दिले आहे परंतु कथानकापूर्वी जे विश्लेषण केलेले आहे त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गुरुचरित्राच्या 21व्या अध्यायात सांगितले आहे की पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. त्यांच्याच वंशभेद योगाने जड देहाची निर्मिती असते.

ज्याच्या मध्ये सत्त्वगुण अधिक्य असेल तो सत्त्वगुणी होतो. म्हणजे पूर्णतः सत्व गुणी असेल तर तो चित्त, वृत्ती प्रवृत्तीने तो देवासमान असतो. ज्याच्यात रजोगुणाधिक्य असेल तो मनुष्य गुणांचा होतो. आणि ज्याच्यात तमोगुणाचाच प्रभाव आहे तो दैत्य वृत्तीचा घडतो अशी ब्रम्हांडाची रचना आहे.

ज्याचा जसा सत्व रज तम या गुणांनी जन्म होईल त्याप्रमाणे तो त्या जन्मात वावरतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचा मोह, वासना आणि इच्छा ह्या ज्या गुणाधिक्या प्रमाणे तो जन्माला येतो त्याप्रमाणे जीव घडतो.

जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये जीव अडकणे, आतोनात आसक्ती असणे, प्रत्येक गोष्टीचा जीवाला मोह होणे आणि या मोहातून बाहेर पडता न येणे, विवेकाने देखील विचारांमध्ये कोणताही चांगला बदल करणे हे शक्य होत नाही, जीवाला कोणत्या ना कोणत्या माहित नसलेल्या गोष्टींची भीति वाटणे — ही सर्व पूर्ण तमो गुणाची लक्षणे आहेत.

अशा जीवांना मृत्यू हा भयावह वाटतो. ब्रम्हांडाचा हा नियमच आहे की प्रत्येक माणूस ज्या तत्त्वांनी घडतो त्या तत्त्वाप्रमाणेच त्याच्या जीवनामध्ये असक्ती चे प्रमाण कमी जास्त असते. कर्म आणि कर्मभोग हे इच्छापूर्ती प्रमाणे होत असतात.

मृत्यू आला की आप्तेष्टांना अतोनात दुःख होते परंतु मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक माणसाला मृत्यू येणारच आहे. त्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याचा मृत्यू घडेल. जर कर्म चांगल असेल तर त्याचा मृत्यू सुखावह होईल. जो कर्महीन असेल, ज्याचं कर्म वाईट असेल त्याचा मृत्यू भयावह राहील.

ज्या कोणत्या गुणाधिक्यांनी माणूस जन्माला आला असेल त्या गुणांचा विवेकाने विचार करून तो जास्तीत जास्त सत्त्वगुणी करणे हेच माणसाच्या जीवनाचे धोरण असायला हवे.

भगवान दत्तात्रेय किंवा सद्गुरू संस्थान ही फक्त सत्व गुणांनी भरलेली असते. सात्विकते शिवाय त्यांच्यात दुसर काहीच नसतं. त्यामुळे सुखदुःखा पासून ते दूर असतात. कोणत्याही सुखाचा त्यांना आनंद होत नाही किंवा त्यांची मनस्थिती बदलत नाही. कोणत्याही दुःखामुळे ते व्यथित होत नाहीत. ते स्थितप्रज्ञ असतात.

गुरुचरित्राच्या २१व्या अध्यायातल्या कथानकाचा आणि विवेचन यांचा विचार केला तर लक्षात येईल की गुरु सदैव प्रत्येकाच्या अंतर्मनाशी संपर्क साधून त्याला विवेकी करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला विचार देण्याचा प्रयत्न करतात की आपले सत्व रज तम या गुणांचा विचार करून आपल्यातील तमाची, रजोगुणाचे प्रवृत्ती जर कमी केली तर आपल्या बराचस्या कामना इच्छा यांचा उपसर्ग कमी होईल.

आपली प्रत्येक गोष्टीची आसक्ती — नात्यातली, जीवनातली — कमी होईल. रजोगुणाचा माणूस हा आयुष्यात ऐश, आराम, सत्तेचा उपभोग यांच्याकडे झुकलेला असतो. मोहमाया ही त्यातूनच उद्भवते.

रजोगुणाचा विकार विवेकाने कमी केला तर सुखदुःखाच्या भावना यांचा उपसर्ग कमी होईल. ज्या प्रमाणामध्ये माणसाचा तमो आणि रजोगुण कमी होईल त्याच प्रमाणामध्ये त्याचा सत्वगुण वाढत राहील.

परंतु हे गुरूंच्या कृपेशिवाय शक्य होत नाही. पुष्प संगे मातीस वास लागे या तत्वा प्रमाणे जो गुरुंच्या निरंतर सेवेत राहतो, निरंतर त्यांच्या छत्रछायेखाली राहतो त्याच्यामध्ये हे सर्व स्थित्यंतर त्याच्या नकळत होत असते.

याच अध्यायामध्ये पुढे सांगितले आहे की गुरुंच्या कृपा दृष्टी मुळे मृत जीव हा पुन्हा सजीव झाला. गुरूंची सत्ता जीवन मरणावर आहे. विधीलिखित काहीही असले तरी ते सहज लीलया योग बदलू शकतात. हा त्यांचा एकमेव अधिकार आहे जो इतर कोणत्याही देवाला नाही.

परंतु कथानका वरून आपल्याला असे वाटते गुरु कोणावर केव्हाही कोणत्याही प्रकारचे कृपा करू शकतात. प्रत्येक माणसाच्या जिवाचा जीवन प्रवास असतो. तो अखंड प्रवास आहे. जीवन जरी समाप्त झालं म्हणजे मृत्युमुखी पडला तरी तो पुन्हा कोणता तरी जीव धारण करून अवतरतो.

त्याच्या प्रारब्धा प्रमाणे तो निरनिराळ्या योनीतून पुढे येतो. गुरूंच्या दृष्टीने जो काही बदल करायचा आहे तो त्याच्या जीवाच्या जीवन प्रवासात करायचा आहे. परंतु त्यायोगे त्यांच्या कृपेमुळे तो जीव उन्नत होत राहतो.

गुरूपौर्णिमेला मृत्यू पुढे ढकलण्याचा प्रसंग

एका गुरूपौर्णिमेला व्यंकटनाथांना एका शिष्याचा मृत्यू पुढे ढकलावा लागला. नागपूरला व्यंकटनाथ महाराजांच्या शिष्यांनी गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम योजला होता. बाहेरगावची तसेच गावातील खूप शिष्य व भक्त मंडळी कार्यक्रमासाठी जमली होती.

गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक शिष्य भावनेने कार्यक्रमासाठी उपस्थित झाला होता. प्रत्येक जणाला काहीना काही अडचणी होत्या परंतु आपल्या गुरूंच्या पूजनाचा आजचा दिवस कसेही करून गुरूंचे पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेणे — यासाठी प्रत्येक जण आतूरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहत होता.

कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली होती. सर्वजण उत्सुकतेने कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत होते.

एवढ्यात काही कुजबुज सुरू झाली. लक्ष गेलं की जेष्ठ गुरूबंधू अण्णासाहेब कोलते यांची पत्नी गेल्या काही कालावधीपासून आजारी होत्या. डॉक्टरांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले होते. त्या नेमक्या कार्यक्रमाच्या दिवशी अत्यवस्थ झाल्या.

जर आज मृत्यू झाला असता तर संपूर्ण कार्यक्रम होऊ शकला नसता. तो रद्द करावा लागला असता. सर्वांचे मनोधैर्य खचले असते.

त्यामुळे काही शिष्यांनी विनंती केली की — महाराज, हा प्रसंग आज घडू नये. आजचा कार्यक्रम झाल्यावर प्रसंग आला तरी चालेल.

बर्‍याच विनंत्यानंतर महाराज म्हणाले की हा प्रश्न कोलते कुटुंबाचा आहे. त्यांचा निर्णय महत्त्वाचा आहे.

नंतर अण्णासाहेबांचा मुलगा महाराजांकडे गेला आणि त्याने विनंती केली की — आजचा कार्यक्रम निर्विघ्न व्हावा, म्हणून आजचा मृत्यू पुढे ढकला.

महाराजांनी विभूतिची एक पुडी दिली व सांगितले की — ही पुडी बाईंच्या डोक्याखाली ठेवा. जोपर्यंत ती तिथे आहे तोपर्यंत जीवाला धोका नाही.

कार्यक्रम अत्यंत उत्तमरीत्या पार पडला.

एक महिन्यानंतरची कठीण वेळ

कार्यक्रम झाला, पण एक महिना निघून गेला. बाईंची प्रकृती अधिकच बिकट. त्यांना आराम देणे अशक्य, त्यांचे हाल पाहवत नव्हते. कुटुंबियांना प्रश्न पडला — आता काय करायचे?

महाराज म्हणाले — तुम्हीच इच्छा केली होती की त्यांनी जाऊ नये. त्यामुळे विभूती दिली. ती जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत त्या जाणार नाहीत. तुमची इच्छा होईल तेव्हा ती पुडी काढा.

परंतु— त्या जाण्याला आपण कारणीभूत ठरू — या भीतीने कोणी धजत नव्हते.

शेवटी महाराजांनीच कृपा दाखवली आणि विभूती विसर्जन करण्यास सांगितले. अशा तऱ्हेने त्या बाईंची सुटका झाली.

गुरू प्रत्येक घटनेवरून काहीतरी शिकवीत असतात. परंतु आपले उद्दिष्ट साध्य झाले की आपण त्या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहतो आणि शिकवणीकडे दुर्लक्ष करतो.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/मृत्यू-पुढे-ढकलला.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)