माधवनाथांचे कार्यक्षेत्र देवगाव रंगारी
शेवट गिरीला बालाजींनी स्वतः दिलेल्या संकेताप्रमाणे माधवनाथ महाराज मजल दरमजल करीत देवगावरंगारी येथे पोहचले.
चित्रकूटच्या पारंपारीक मंदीराचे महात्म्य स्वत: बालाजींनी माधवनाथांना दर्शन देऊन व मार्गदर्शन करून देवगाव रंगारी येथे आणले होते.
चित्रकूटच्या मंदिराची आखणी लक्षात घेऊन देवगाव येथील मंदिराची योजना माधवनाथांनी स्वत: पूर्ण केली आणि मंदिराची उभारणी पूर्ण करून घेतली.
देवगावला निरनिराळ्या देवतांनी येऊन आपली साक्ष मूर्तीस्वरूपात सांकेतिक पद्धतीने दिली व तिथे नाथ पंथाचे एक सिद्धस्थान तयार झाले.
जमलेल्या सर्व स्वयंसिद्ध मूर्तींची प्राणप्रतिष्ठा स्वतः माधवनाथांनी केली.
—
चित्रकूटचा त्याग केल्यावर पंथाचे सर्व महात्म्य माधवनाथांनी स्वत: देवगाव रंगारी येथे 1901 साली आणले.
नंतर जीवनभर देवगाव रंगारी येथूनच आपले पंथकार्य त्यांनी केले.
हे सर्व जे घडले त्यातून परंपरेच जे मार्गदर्शन होते त्याप्रमाणे माधवनाथांनी कार्य केले.
समाधी घेण्यापूर्वी माधवनाथांनी गुरु कार्याचा आणि देवगांव येथून नव्याने सुरू झालेल्या नाथपंथ परंपरेच्या कार्याचा भार त्यांनी स्वतः व्यंकटनाथ महाराजांवर सोपवला.
—
चित्रकूटहून त्यांनी 11 वर्षे पंंथ कार्य केल्यानंतर, 1890 साली चित्रकुटाचा त्याग केला.
12 वर्षे पुन्हा अज्ञातवासात राहून ते तीर्थाटन करीत राहिले.
नंतर त्यांनी स्वतः बालाजींच्या आदेशावरून 1902 साली देवगाव रंगारी येथे मंदिराची स्थापना केली व त्यांच्या कार्याला पुन्हा सुरुवात झाली.
—
ज्या चित्रकूट करवीरला जन्मानुजन्म पिढ्या-न-पिढ्या अनेक नाथांनी प्रदीर्घ काळपर्यंत कार्य केलं त्या चित्रकूटला माधवनाथ महाराज केवळ अकरा वर्षे कार्य करू शकले.
नंतर त्यांच्या लक्षात आले की आता या ठिकाणी अखंड परंपरेचं महत्त्व राहिलं नाही — आता हे स्थान बदलण्याची वेळ आली आहे.
याच्यावरूनच कलियुगाच्या वाढत्या परिणामाची जाणीव होते.
—
नाथ गीतांजली म्हणजे माधवनाथांची भजन गीते 1919 साली प्रसिद्ध झाली.
माधवनाथ संजीवनी ग्रंथ 1922 साली प्रकाशित झाला.
दीपप्रकाश पोथी 1923 साली प्रकाशित झाली.
त्यांनी देवगावहून कार्य सुरू केल्यावर 17 वर्षांनंतर त्यांचे सांप्रदायिक भजन सुरू झाले.
त्यांच्या समोर हे भजन 1936 म्हणजे 17 वर्षे त्यांच्या समोर होत होते.
दीपप्रकाश पोथीचे पारायण त्यांच्या समोर 13 वर्षे होत होते.
त्यांनी 1936 सालापर्यंत म्हणजे 34 वर्षे देवगाव रंगारी येथून कार्य केले.
—
दीपप्रकाश ह्या पोथीच्या लिखाणानंतर 13 वर्षे केलेल्या त्यांच्या कार्याचा कुठे उल्लेखच नाही.
त्यांनी नंतर केलेल्या कार्याची व योजनेची लोकांनी माहिती घेतलीच नाही.
लोकांच्या मनोवृत्तीत केवढे हे परिवर्तन होतांना दिसत आहे.
ज्ञाननाथांपासूनच कलीचा हा वाढता परिणाम लक्षांत येत आहे.
—
लोकांचे जीवन सुसह्य करण्या करिता, आप्तेष्टांचा स्वजनांचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन त्यांनी संन्यस्थ राहून तीर्थाटन करीत, देशाटन करण्यात आणि लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात खर्च केले.
माधवनाथांना देखील, जीवनभर अतोनात कष्ट, त्रास आणि हालअपेष्टा सतत सहन कराव्या लागल्या.
परंतु माधवनाथांच्या कार्याचा त्यांनी केलेल्या योजनेचा आढावा न घेता त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टि जशा आहेत तशा न सांगता नंतरच्या विश्वस्थांनी, शिष्यांनी व भक्तांनी त्यात बदल करून, आपल्या भावना व विचार घालून नवीन गोष्टि न्यासाच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात केली.
ह्यावरून लोकांच्या जीवनावर कलियुगाचा भयंकर परिणाम झाल्याचे निदर्शनास येते.
—
गुरूंच्या जिवनाचा आणि त्यांच्या जीवनकार्याचा विचार न करता आपल्या उदात्त विचारांनुसार गुरूंचे आदर्श लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
भावी पिढीने हे होत असलेले स्थित्यंतर गांभीर्याने घेऊन कलियुगाचा घराघरावर, व्यक्ती-व्यक्तीवर होत असणारा परिणाम ओळखावा आणि स्वतः विवेक, सद्बुद्धी, सत्शीलता, सदाचार, सात्विक वृत्ती व धर्मनिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करावा.
—
चित्रकूटहून आकाश मार्गाने पंथाची आभूषणे आणली
चित्रकूटचा त्याग करण्यापूर्वी पंथाची सर्व आभूषणे चित्रकूट येथील मंदिराखालच्या गुहेत होती.
त्या गुहेत कोणालाही जाणे शक्यच नव्हते.
नागदेवता व अग्निदेवता त्याचे रक्षण करीत होते.
फक्त नाथांनाच आत कसे जायचे हे माहित होते.
—
स्वत: माधवनाथांनीच चित्रकूट ते देवगाव हे अंदाजे 900 किमीचे अंतर आकाश मार्गाने गांठले.
चित्रकूट येथील पंथाची आभूषणे, वस्त्रे, शस्त्रे, अस्त्रे, विभूती आदी सर्व त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने देवगाव येथे रातोरात आणली.
—
त्यांनी जाहीर केले:
“नाथ परंपरेचा चित्रकूटशी आता भविष्यात कोणताही संबंध राहणार नाही.”
पंथाचे सर्व महात्म्य त्यांनी स्वतः संपुष्टात आणले आणि देवगावला आणले.
तत्त्वतः जे चित्रकुटाचे महात्म्य होते ते आता देवगावला प्राप्त झाले.
—
देवगावहून हे कार्य माधवनाथांनी 34 वर्षे चालू ठेवले.
समाधी घेण्यापूर्वी पुढची व्यवस्था स्वतः केली.
अशाप्रकारे नाथ परंपरेचे कार्य जे शतकानुशतके चित्रकूटहून होत होते ते बदलून आता देवगावहून सुरू झाले.
—
कार्यस्थळ गुरूंचे आणि कार्यही गुरूंचच — म्हणून त्यांना अशा स्थानांतरणाचे पूर्ण स्वातंत्र्य असते.
लोकांची सामाजिक भूमिका, मानसिकता, भक्त-शिष्यांचा विचार — यांचा काहीही संबंध नसतो.
सर्व व्यवस्थापन गुरूंच्या सूक्ष्म योजनेतूनच होते.
—
करवीरहून आणलेल्या गुप्त वस्तू, शस्त्रे, अस्त्रे यांना ठेवण्याची व्यवस्था देवगाव मंदिरात केली होती.
देवघराच्या खालीच एक गुप्त गुहा तयार केली होती.
तीथे सहज जाणे शक्य नव्हते.
वर फरशी, त्यावर पाट, आणि त्याखाली तळघर — अशी व्यवस्था होती.
—
व्यंकटनाथ महाराजांचा अग्निपरीक्षेचा प्रसंग
माधवनाथ महाराज पुण्याला होते.
उन्हाळ्याचे दिवस.
घरातील सर्व मंडळी तिसऱ्या मजल्यावर गच्चीवर झोपली होती.
खाली फक्त व्यंकटनाथ महाराज झोपले होते.
—
रात्री त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला.
फरशी काढण्याचा प्रयत्न करताच आतून भयंकर आवाज आला:
“बच्चा, दूर हो जा! नहीं तो मर जाएगा!”
तरीही व्यंकटनाथ पुन्हा प्रयत्न करू लागले.
—
फरशी काढताच प्रखर अग्निलोंढा बाहेर आला. तो जवळजवळ अर्धा तास सुरू होता.
१० फुटांपर्यंत उष्णता जाणवत होती.
थोड्या वेळाने आग शांत झाली.
—
व्यंकटनाथ साडेतीन फुटाच्या पायरीवर उतरले आणि खाली उडी मारली.
उडी पडल्याबरोबर मोठ्या भुजंगाने दंश केला.
हातातील विभूती दंशावर लावताच ते बेशुद्ध पडले.
—
शुद्धीवर आल्यावर त्यांनी पाहिले की त्यांचे हात मच्छिंद्रनाथांच्या खडावांवर पडले होते.
भुजंग नाहीसा झाला होता.
—
वरील प्रसंग माधवनाथांच्या सूक्ष्मदृष्टीतही आला.
ते म्हणाले:
“तिथे तुला वाचवायला कोण आलं असतं? फक्त नाथांच्या पादुकांच्या स्पर्शाने तू वाचलास.”
गुहेचा मार्ग त्या घटनेनंतर बंद करण्यात आला.
—
अशा तऱ्हेने चित्रकूटचे महात्म्य संपले आणि देवगावच्या मंदिराची जडणघडण सुरू झाली.
ते आजही नाथ परंपरेचे शक्तिकेंद्र आहे.
भुजंग, अग्नी आणि पंचमहाभूते त्याचे रक्षण करतात.
कोणतेही भय नाही — ते पूर्ण सुरक्षित आहे.