श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

माधवनाथांना चित्रकूट सोडण्याचे संकेत

भूमीवर जे दैवी कार्य चालू असते ते ठिकाण दैवी शक्ती कशा प्रकारे अस्तित्वात आणतात हे समजून घेण्यासारखे आहे. गुरु कार्य हे भूमीवरूनच होणार, परंतु जेथून गुरु हे कार्य करणार तेथे परमेश्वर आपले वास्तव्य, आपले अस्तित्व कशाप्रकारे ठेवतो हे समजून घेण्यासारखे आहे.

कार्याला पारंपारिक शक्तीच पाठबळ तर असतेच. ते कार्य करणार्‍या व्यक्तीच्या अंगभूत शरीरातून तसेच जेथून हे कार्य केलं जातं ते ठिकाण देखील शुद्ध आणि पवित्र ठेवले जाते. ते एवढे जास्त शुद्ध आणि पवित्र असतं की त्या ठिकाणी नुसता माणूस शरीराने नकळत जाऊन आला तरीही ती ऊर्जा त्याच्या शरीराला मिळत असते. तो जसा संवेदनशील असेल तसे त्याला जाणवेल.

कार्याच्या ठिकाणाची योजना गुरुसंस्था, परमेश्वर किंवा ब्रह्मांड करतात. जे सद्गुरु प्रत्यक्ष कार्य करत असतात त्यांचं निजस्थान, कार्यस्थळ कसं असावं त्याची घडण ते स्वतः सांकेतिक रूपाने करून ठेवत असतात.

देवगाव रंगारी येथे व्यंकटनाथ महाराजांचे निजस्थान होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी देवगाव रंगारीत असलेल्या आपल्या निवासस्थानातून कार्य केले. नाथ परंपरेतल्या स्वामी मच्छिंद्रनाथांपासून अखंड परंपरेने कार्य करणारे ते पंधरावे नाथ होते. त्यांच्या निजस्थानाला देखील तेवढेच ऐतिहासिक महात्म्य आहे — ते कसे हे पाहू.

ज्ञाननाथांनंतर बहुतांश नाथांनी पंथ परंपरेचं कार्य हे करवीर चित्रकूट येथूनच केलं. नाथांचं ते परंपरागत शक्तिस्थान होतं. परंपरागत कार्यस्थळ होतं. नवनाथांनी आपलं वैभव — शस्त्र, अस्त्र, विभूती आदी परंपरागत शक्तिशाली वस्तू — तेथेच गुप्त रूपाने ठेवल्या होत्या.

त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे नाथांशिवाय कोणीही जाऊ शकत नाही, अशी नाथ परंपरेच्या शक्तीने स्वयंसिद्ध योजना केली होती. जर कोणी तेथे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्यक्ष अग्नीशी सामना द्यावा लागे — तोही एवढा प्रखर की माणूस केवळ पाच मिनिटातच जळून भस्म होईल. अग्नीची मर्यादा ओलांडून पुढे गेला तर भलेमोठे भुजंग त्याला दंश करून तिथल्या तिथे मृत्यूमुखी पाडतील.

अशा भयंकर योजना नाथांनी संरक्षणार्थ केलेल्या होत्या. त्यामुळे नाथांची ही गुप्त जागा पूर्णतः संरक्षित आहे, शिवाय तेथे कोणी कधी येऊ शकणार नाही याची पुरेपूर खात्री नाथांनी घेतली होती.

ह्याच ठिकाणी माधवनाथ महाराज गादीवर बसले होते. कलियुगाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि तेथील लोकांच्या मनोवृत्तीत खूपच फरक पडला होता. कार्याच्या दृष्टीने आता हे परंपरागत ठिकाण योग्य राहिले नाही, म्हणून हे स्वयंसिद्ध ठिकाण बदलण्याची वेळ आली होती.

गुरूंना पंथ कार्य हे समाजातच करायचं आहे, आणि समाजात ज्या प्रकारचे लोक असतील त्या लोकांमध्ये राहूनच कार्य करायचे असते. हे लक्षात घेऊन हे ठिकाण स्वाभाविकपणे, नैसर्गिक रित्या कसे बदलले गेले हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

माधवनाथांनी चित्रकूट सोडावे याचे संकेत त्यांना चित्रकूट येथे कार्य करीत असतानाच मिळाले होते.

  • * मंदिरावर वीज पडून मंदिरापुढील सभामंडप व काही खांब पूर्णपणे तुटून गेले.
  • * मंदिरापुढचा ओटा पडका झाला.
  • * वरच्या फरशा पार नाहीशा झाल्या.
  • * मंदिराचा दरवाजा मोडकळीस आला.
  • * मध्यभागी अचानक वीज पडल्यामुळे बराचसा भाग तुटला.

त्याला टेकण देऊन तो कसाबसा उभा केला होता. मंदिरातील मुख्य गाभारा आणि मूर्ती मात्र उत्तम स्थितीत होती.

ज्या ठिकाणी विठ्ठलनाथ महाराज — म्हणजे माधवनाथांचे परमगुरु — राहत असत व ज्या ठिकाणी माधवनाथांचा जन्म झाला, ती जागा मात्र पूर्णपणे उध्वस्त झाली होती.

सर्व परिस्थितीमुळे बाकीचे आधाराचे खांब खिळखिळीत झाले होते. गुप्तनाथांची समाधी व अवतीभवतीचे जुने बांधकाम पडायला लागले होते. त्याचा जीर्णोद्धार करण्यासारखी देखील त्याची परिस्थिती नव्हती.

सभोवतालच्या वातावरणांत खूप फरक पडला होता.

पंचमहाभूते ज्यांच्या पूर्णपणे स्वाधीन आहेत, जे काहीही केव्हाही करू शकतात — त्यांनी हा प्रकार थांबवू शकला नसता का? पाऊस थांबवणे, वीज पडू न देणे, इमारत जशीच्या तशी पक्की ठेवणे — हे ते सहज करू शकले असते.

जिथे गुप्त शक्ती ठेवलेल्या आहेत ती जागा सुरक्षित राहू शकते — याचाच अर्थ ईश्वरी संकेत आहेत की आता ही जागा बदलण्याची वेळ आली आहे.

पंचमहाभूतांचा खेळ ही ब्रह्मांडाची भाषा आहे ना? ही भाषा नाथपंथीयांना चांगली समजते.

शिवाय जुन्या लोकांकडून, भक्तांकडून, शिष्यांकडूनही हे पीठ माधवनाथांनी सोडून जावे असे वातावरण वाढत होते. गुरूमाय — म्हणजे विश्वनाथांची पत्नी ठकुबाई — तर माधवनाथांना स्पष्ट शब्दात म्हणाल्या होत्या:

“तू आता येथून निघून जा, चालता हो. अजून किती नुकसान करणार आमचं म्हणजे करवीर पिठाच?”

माधवनाथांना मिळालेल्या संकेतावरून त्यांनी चित्रकुटाचा त्याग करण्याचे निश्चित केले. कोठे जायचे हे त्यांनी सांगितले नसले तरी एवढे सांगितले की:

“मी खडकावर उभा राहिलो तर तिथे मंदिर निर्माण करीन.”

ते अंगावरच्या कपड्यानिशी एके दिवशी रात्री चित्रकूट सोडून निघाले. जाताना म्हणाले:

“आता ही शापित भूमी झाली. आम्ही येथे पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही.”

पंथ कार्य आणि सर्व योजना यथावकाश समोर येतील. परंपरागत ठेवलेल्या गुप्त वस्तू आणि नाथांच्या योजनांचे मूळ आम्ही आकाश मार्गाने येऊन घेऊन जाऊ. भूमीला स्पर्शही करणार नाही.

जोपर्यंत आम्ही हे करत नाही तोपर्यंत पंथाने केलेले स्वसंरक्षण शक्तिशाली राहील. कोणी स्पर्श करू शकणार नाही. प्रयत्न केला तर तो तिथेच मृत्यूमुखी पडेल. नाथांचा महिमाच तो.

नाथ पंथीयांचा अधिकार पंचमहाभूतांवर, चराचरावर, ब्रह्मांडावर पूर्णपणे आहे. जे मनात येईल ते, ते काहीही करू शकतात — हे त्यांचे सामर्थ्य आहे.

म्हणूनच आकाशाखाली पृथ्वीवर कोणतेही स्थान त्यांच्या अधिकारा खालचेच आहे.

कलियुगाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम लक्षात घेऊन आपलं पारंपारिक कार्यस्थळ बदलावं लागलं आणि ते नैसर्गिकपणे अशाप्रकारे घडलं.

अशा तऱ्हेने माधवनाथांनी चित्रकुटाचा त्याग केला. ही घटना सामान्यांच्या दृष्टीने एक व्यवहारी घटना वाटत असेल; परंतु आध्यात्मात व गुरुकामात व्यवहारी दृष्टिकोन विसंगत असतो.

नाथपंथामध्ये तर सर्व काही परंपरागत गुरूसंस्थाच नियंत्रित करते.

नाथांच्या आध्यात्मिक कार्याचे मूल्यांकन करणे — यासारखा वेडेपणा नाही. ज्या विषयाचे ज्ञानच नाही त्याबद्दल मत करणे चुकीचे आहे.

व्यवहारिक घटनांचा विचार आध्यात्मात विसंगत ठरतो. आध्यात्मिक तत्त्वे न समजता गुरूंवर किंवा त्यांच्या कार्यावर विचार मांडणे हे अविकसित मनाचे लक्षण आहे.

गुरूंच्या कार्याशी संबंधित सर्व गोष्टी तसेच गुरूंचे धोरण हे शिष्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. साधकाला गुरू वेळोवेळी अंतर्मनातून मार्गदर्शन करीत असतात. साधक जेवढा समर्पित असेल तेवढे त्याला तात्काळ ज्ञान होते.

गुरू–शिष्याचे नाते हे अतिशय अंतरंग असते — फक्त त्यांनाच समजते.

जे गुरूपदी पोहोचले त्यांना त्यांचे गुरू आणि संपूर्ण गुरुपरंपरा मनाप्रमाणे वागू देईल का? निर्णय घेऊ देईल का? नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीवर संपूर्ण परंपरेचे लक्ष असते.

समाधिस्त गुरू लोकांच्या दृष्टीने समाधिस्त असतात; परंतु नाथपंथात ते सर्व मिळून एक नाथशक्ती बनतात आणि सतत कार्यरत असतात.

शिष्याच्या हाकेला गुरू कसे धावून येतात याची अनुभूती शिष्य घेत असतो. तसेच गुरू कार्यरत शिष्याला वेळोवेळी प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत असतात.

अशा रीतीने चित्रकूटचे पारंपारिक स्थान मोडले गेले आणि पुढे भगवान विष्णूच्या आदेशाने ते कुठे आणि कसे प्रस्थापित झाले हे पुढील भागात पाहू.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/माधवनाथांना-चित्रकूट-सोडण्याचे-संकेत.txt was सर्वात शेवटचा बदल: on 31-Jan-2026 (21:38)