कर्म विपाक सिद्धांत अर्थात कर्माचा जीवावर परिणाम
गुरूचरित्राच्या अठ्ठाविसाव्या अध्यायात जो कर्मविपाक सिद्धांत सांगितला आहे, तो समजून घ्यायची गरज आहे. हल्लीच्या काळात हे सर्व विचार नियमबाह्य, अप्रगल्भ, संकुचित असे वाटतात. हीच तर कलियुगाची परिस्थिती आहे. या समाजातील बदललेल्या परिस्थितीमुळे ब्रम्हांडाचे नियम बदलत नाहीत हे लक्षात घेऊन आपण आपले व्यवहार त्याप्रमाणे करावे.
वर्णव्यवस्था आणि आधुनिक समाज
वर्ण व्यवस्था ही पुरातन काळातली गोष्ट आहे. हल्लीच्या काळात समाजाने ती नाकारली आहे. हल्लीच्या काळात ज्याला जे कर्म करता येईल, जो व्यवसाय करता येईल, जे काम करता येईल, ते त्याने करावे; त्याला कोणतीही बंधने नाहीत.
आधीच्या काळात जातीचा विषय राहिलाच नाही; ज्याला जे वाटेल ते त्याने काम करावे. कोणत्याही प्रकारचे काम कोणीही केलेलं आजच्या समाजाला आवश्यकच आहे. समाजातील लोकांचा आणि प्रचलित वाङ्मयाचा रोख हा मनुष्यधर्माचा आहे, मानवी जीवनाचा आहे. मानवी जीवनासाठी जे लागेल, जे वाटेल ते करावे.
प्रत्येक माणसाने समाजातील सगळ्या स्तरांतील, सगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर वर्णव्यवस्थेचा विचार न करता बरोबरीने रहावे आणि सर्वांबरोबर वागावे ही आजची परिस्थिती आहे.
सामाजिक बदल आणि आचार-विचार
आजच्या परिस्थितीत समाजामध्ये ब्राह्मणाला कोणतेही प्राधान्य नाही. ब्राह्मण देखील ज्या पद्धतीने राहिला पाहिजे त्या पद्धतीने राहत नाहीत. आज समाजात जातीप्रमाणेच विवाह होतील असे काही नाही. स्त्री-पुरुषांचा संबंध पूर्वी ज्या तत्त्वांवर पाहिला जात होता, तो आता पूर्णतः बदललेला आहे. गर्लफ्रेंड–बॉयफ्रेंड ही आजची संस्कृती आहे.
गुरूचरित्राच्या काळातील गोष्ट वेगळी होती. त्यामुळे आता जे कर्म असेल—चांगले किंवा वाईट—त्याप्रमाणेच जीवनाचे योग आणि भोग ठरतात. वर्णव्यवस्था समाजातून गेली असली तरी ती चित्रगुप्ताच्या नजरेतून गेलेली नाही.
श्रीगुरु आणि सात जन्मांची स्मृती
३६व्या लेखात सांगितल्याप्रमाणे, श्रीगुरूंनी रस्त्यावरून जात असलेल्या एका माणसाला बोलवले. “तू कोण?” असे विचारता तो म्हणाला, “मी मागासवर्गीय आहे. तुम्ही बोलावलेत, मी धन्य झालो. सर्व प्राणिमात्रांवर तुम्ही सारखीच कृपा करता.”
त्या दोन विप्रांना हे समजले की आलेला माणूस मागासवर्गीय आहे, त्यामुळे त्याला वेदांचा गंध नाही. त्या काळानुसार वेद हे केवळ ब्राह्मणच म्हणू शकत होते. इतर कुणालाही नव्हते. कारण शुद्ध विचार, शुद्ध आचार, शुद्ध उच्चार, शुद्ध मन, गुरुनिष्ठा ही वैशिष्ट्ये फक्त ब्राह्मणांमध्ये होती.
श्रीगुरूंनी जमिनीवर सात रेषा काढायला सांगितल्या आणि त्या माणसास भस्म लावून एक-एक रेषा ओलांडायला सांगितले.
तो पहिली रेषा ओलांडताच म्हणाला—“मी किरात वंशातील भिल्ल जातीत वनराखी होतो.”
दुसरी रेष ओलांडताच पूर्वजन्म आठवला—“मी नावाडी होतो.”
तिसरी रेष—“मी जातिहीन, रस्त्याने जात होतो, श्रीगुरूंनी मला बोलावले.”
चौथी रेष—“मी वैश्य वंशातील सोमदत्त होतो.”
पाचवी रेष—“मी क्षत्रिय होतो; नाव गोदावरी म्हणजे गोवर्धन होते.”
सहावी रेष—“मी ब्राह्मण, वेदशास्त्री, व्याकरण अभ्यास झालेला अध्यापक आहे.”
सातवी रेष—तो म्हणाला—“या जन्मी मी ब्राह्मण असून अध्यापक आहे.”
कर्मविपाक सिद्धांताचे मूळ तत्त्व
तो विचारतो—“मी जर पूर्वी विप्र होतो, तर या जन्मी शूद्र का झालो?” श्रीगुरू म्हणाले—“हा कर्मविपाक सिद्धांत आहे.”
केलेल्या कर्माचा परिणाम जीवाला भोगावा लागतो.
वर्णव्यवस्था नाकारल्यामुळे प्रत्येकाचे कर्म संकरीत झाले; शुद्ध न राहता चांगले–वाईट मिश्र झाले. चांगल्या कर्माचे फळ येण्यासाठी पिढ्यानुपिढ्या प्रयत्न करावे लागतात, आणि वाईट कर्माचे फळही अनेक पिढ्यांनी भोगावे लागते.
व्यभिचार, अनाचार आणि त्यांच्या परिणती
व्यभिचार हा मुळातच निंद्य आहे. त्यातही वर्णविचाराचा त्याग करून केलेला व्यभिचार अनेक अनर्थांना जन्म देतो. गुरूचरित्रातील वर्णन समजले तर “एकपत्नीव्रत”, “मातृवत् परदारेषु” यांचे माहात्म्य लक्षात येते.
विप्राने अनाचार केला—गुरूमाता-पिता यांना सोडले—तर तोही पतित होतो. खोटे न बोलणे, चोरी न करणे, यज्ञ करणे/करविणे, शिकणे/शिकविणे—ही विप्रजातीची षट्कर्मे आहेत.
त्यांचा त्याग करणारा पतित होतो.
पापानुसार रोग आणि योनीभ्रष्टता
गुरूचरित्रात पुढे सांगितले आहे की—
- - मूत्रकृच्छ्र
- - क्षयरोग
- - कुष्ठ
- - गंडमाळा
- - चर्मरोग
- - पांडुरोग
हे सर्व कसे आणि का होतात त्याचे विवरण दिले आहे.
चोरी करणारा उंट होतो. परस्त्रीकडे कुबुद्धीने पाहणारा चाक्षुरोगी होतो.
प्रायश्चित्ताची विधानं
जर पाप घडलेच तर त्यासाठी प्रायश्चित्त सांगितले आहे—
- - ब्राह्मणांना दक्षिणा
- - सुवर्णदान
- - गुरूसेवा
- - नदीयात्रा
- - प्राणायाम
- - उपवास
- - गायत्री जप
- - तीन दिवस वायू, एक दिवस दूध
- - पवमान, पुरुषसूक्त, त्रिमधु
पतिपत्नीपैकी एकाने पाप केले तरी दोघांनीही प्रायश्चित्त घ्यावे लागते.
देहभोग आणि जीवाचे संस्कार
श्रीगुरू म्हणाले—“तुझा देह पतित आहे. जीवाला त्या त्या योनीतील अवस्था प्राप्त होते. हा भोग देहानेच भोगायचा असतो.”
गर्भधारणेच्या वेळी आत्मा आणि देह एकरूप होतात. आत्म्यावरील संस्कार देहामार्फतच होतात. त्यामुळे देहावर संस्कार केल्याशिवाय आत्मा शुद्ध होऊ शकत नाही.
श्रीदत्तात्रेय पुढे सांगतात—वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे विश्वामित्रांनी रवीकिरणांनी देह पाचन करून नवीन देह धारण केला आणि तेव्हा ते ब्रह्मर्षी झाले. हे फक्त त्यांनाच शक्य झाले.
कर्माचे परिणाम आणि पुढील जन्म
गुरूचरित्रात आपल्या कर्माचे जीवावर होणारे परिणाम सांगितले आहेत. ह्या कर्माप्रमाणे पुढील जन्म ठरतात.
समाजरचना कशीही बदलली तरी ब्रम्हांडाचे नियम बदलत नाहीत. चांगले किंवा वाईट कर्म—दोन्हींचा परिणाम पुढील जन्मातील योग आणि भोगावर होतच राहतो.
भगवान दत्तात्रेयांनी हे सर्व विवेचन केले आहे असे गुरुचरित्रात सांगितले आहे. प्रत्येकाने हे समजून आपल्या जीवनाची दिशा ठरवावी.