श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

वेद-विज्ञान आणि मानवी जीवन

२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य असे मानले जाते. विज्ञान, आध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे आध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, आध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु *‘तो का करायचा?’* हा मूळ प्रश्न असतो.

आध्यात्म आणि आधुनिक विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आध्यात्म हे वैदिक विज्ञान आहे, तर विज्ञान हे आधुनिक आध्यात्म आहे. तरीही एक सूक्ष्म फरक आहे — आध्यात्म व्यक्तिगत, तर विज्ञान सार्वजनिक.

साधना, तप वगैरे करून आध्यात्मात व्यक्तिगत विकास साधता येतो, तर वैज्ञानिक शोध सार्वजनिक विकास साधू शकतात. विज्ञानाचा उपयोग करून सर्वसाधारण माणूसदेखील एक बटण दाबून प्रकाश निर्माण करू शकतो, टीव्हीवर जगभरातील घडामोडी पाहू शकतो; तर आध्यात्म व्यक्तिगत पातळीवर अशा अनुभवांची अनुभूती देऊ शकते. पराकोटीची आध्यात्मिक उन्नती साधलेला योगी कोणतीही वैज्ञानिक उपकरणे न वापरता अशा अनेक गोष्टींची अनुभूती घेत असतो.

हे खरे आहे की खोटे, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यावर एकच उपाय आहे — आपली आध्यात्मिक उन्नती स्वतः साधणे. त्या सात्त्विक पातळीपर्यंत स्वतःला नेणे. परंतु आजच्या धावपळीच्या युगात हा प्रकार अशक्यप्राय आहे.

प्राचीन शास्त्रांनुसार, अशा उच्चतम पातळीपर्यंत विकास घडविण्यासाठी अनेक जन्म लागतात. साध्या माणसाला ही तपश्चर्या शक्य नसते. मग उपाय काय?

आपल्या दैनंदिन जीवनातील दुःख–त्रास–निराशा–अपयश यावर आध्यात्मात उपाय आहेत, म्हणून आपण धार्मिक सोपस्कार करतो; पण हवे ते यश किंवा परिणाम दिसत नाहीत. उलट आधुनिक विज्ञानात स्पष्ट पद्धती आहेत — बटण दाबले की चॅनल, नंबर डायल केला की संपर्क.

परंतु हे जेवढे खरे आहे, तेवढेच आध्यात्मही खरे आहे आणि तेही तितकेच सोयीस्कर होऊ शकते. विज्ञानाला प्रक्रिया आहे; आध्यात्मालाही स्वतंत्र प्रक्रिया आहे. ती आत्मसात केली की आध्यात्मही तितकेच सोपे होते.

विज्ञानात शास्त्रज्ञ संशोधन करतात; आध्यात्मात ऋषिमुनी, साधुसंत, योगी हे कार्य करतात.

ज्योतिषशास्त्र हे ग्रह–नक्षत्रांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासते. आधुनिक खगोलशास्त्रही तेच करते — दृष्टिकोन वेगळा आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण समुद्रावर भरती–ओहोटी निर्माण करते; मानवी शरीरातील रक्त समुद्राच्या पाण्यासारखे असल्याचे आधुनिक वैद्यक सिद्ध करते. पौर्णिमेला रक्तदाब वाढणे, पागलखान्यातील रुग्णांची विचित्र वागणूक — हे सर्व चंद्राच्या परिणामामुळेच.

म्हणजेच चंद्रच नव्हे तर सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र, खगोलीय वस्तू या मानवाच्या प्रत्येक कणावर परिणाम करतात. ह्या सूक्ष्म गणिताला आकार देणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.

परंतु कुडमुड्या ज्योतिष्यांनी हे शास्त्र बदनाम केले. जे स्वतः अनुभवहीन असून इतरांच्या भवितव्याशी खेळतात. अचूक भविष्य सांगणारे, गणित जाणणारे ज्योतिषी फार थोडे — त्यांना भेटणे म्हणजे दैवयोग.

आध्यात्माशी निगडित वास्तु, स्थापत्य, नृत्य, संगीत, गायन, यज्ञ, कर्मकांड ह्यांच्या मागे अत्यंत गहन विज्ञान आहे. आधुनिक विज्ञान त्यापुढे तोकडे आहे.

उदाहरण घ्या — प्राचीन मंदिरांचा घुमट हा पॅराबोलिक आकाराचा. ॐकार किंवा वैदिक मंत्र म्हणल्यावर ध्वनी घुमटावरून परावर्तित होऊन अनेक पटींनी प्रभावी बनतो. आजच्या मंदिरांमध्ये हे वास्तुशास्त्र पाळले जात नाही. गाभाऱ्यात टाइल्स लावल्या जातात, घुमटाचा आकार नष्ट होतो. अशा ठिकाणी पूर्वीसारखी पवित्रता राहील का? आपल्याला ह्या प्राचीन कलेची संकल्पनाच माहीत नसल्यामुळे आपण विचारही करू शकत नाही.